महत्वाच्या बातम्या

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नगरपंचायत वाचनालयाचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नगरपंचायत वाचनालय लाखांदूरच्या नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या अभ्यासिका व वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

नवीन वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, एकूण ७० आसन क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या वाचनालयामध्ये दररोज सुमारे १२० विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.

वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके नगरपंचायत निधीतून तसेच देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी मासिके, दैनिक वर्तमानपत्रे, रोजगार समाचार व विविध जाहीराती नियमित उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

वाचनालयाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून, वाचनालय कर्मचाऱ्यांमार्फत नियमित देखरेख केली जात आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असून, आतापर्यंत येथून अभ्यास करून १२० पेक्षा अधिक विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये सेवेत दाखल झाले आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

या लोकार्पण सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगरपंचायत प्रशासनाचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ.प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, आमदार परिणय फुके, नगराध्यक्ष विनोद ठाकरे, उपनगराध्यक्ष देशमुख जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्याधिकारी आशिष घोडे, त्यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos