खापा येथे शाळेच्या बसची धडक : बारावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर देण्यासाठी मोटारसायकलने परीक्षा केंद्राकडे निघालेल्या विद्यार्थ्याचा भरधाव स्कूलबसच्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी २३ सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापा–पारशिवनी मार्गावरील खैरी (पंजाबराव) शिवारात घडली.
सिलेंडन बुद्दलाल परतेती (वय २०, रा. कोदेगाव, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दाहोदा (ता. रामटेक) येथील Jai Seva Adivasi Junior College येथे कला शाखेत शिक्षण घेत होता. याच महाविद्यालयात त्याचे परीक्षा केंद्र असल्याने तो दररोज मोटारसायकलने कोदेगावहून दाहोदा येथे जात असे.
मंगळवारी अर्थशास्त्राचा पेपर असल्याने सिलेंडन सकाळी मोटारसायकल (क्र. एमएच ३६ एएफ ८६२१) ने पारशिवनीमार्गे दाहोदा येथे निघाला होता. खापा–पारशिवनी मार्गावरील खैरी (पंजाबराव) शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्कूलबसने (क्र. एमएच ४० वाय ०७८०) त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर स्कूलबस बडेगाव (ता. सावनेर) परिसरातील Aarambh School ची असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
परीक्षेला जात असताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. बसचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
News - Nagpur




Petrol Price




