महत्वाच्या बातम्या

 जुन्या वैमनस्यातून सावकाराची नृशंस हत्या : कारंजा गावात खळबळजनक घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील कारंजा गावाजवळील भद्रूटोला येथे जुन्या वैमनस्यातून एका सावकाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवार १२ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र मदारकर (४५) रा. कारंजा असे असून, ते गावात सावकारी करीत होते. महेंद्र मदारकर यांचे गावातील काही तरुणांशी पूर्वीपासूनच वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादात त्यांनी संबंधित तरुणांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सकाळी महेंद्र मदारकर आपल्या घराशेजारी फिरत असताना, गावातील काही तरुणांनी त्याला घेरले. आपला जीव वाचवण्यासाठी महेंद्र पळत सुटले आणि भद्रूटोला येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या कॉलमच्या खड्ड्यात पडले. त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत तिथेच ठार केले.

घटनेची माहिती मिळताच कारंजा गावाच्या पोलीस पाटील अलका रंगारी यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरी तपासणीसाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राज गब्बर (३५), अजय कलाने (३३), गुलशन उईके (३०) आणि कृष्ण सत्यवान मेश्राम (२२) या कारंजा गावातील चार संशयित तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महेंद्र मदारकर हे गुंड प्रवृत्तीचे होते आणि सावकारीमुळे अनेकांशी त्यांचे वैमनस्य होते. त्यांच्या मुलाचा गावात दारू विक्रीचा व्यवसाय असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सध्या या प्रकरणाचा तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos