महत्वाच्या बातम्या

 सानगडीच्या तलावात २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह


-  दोन दिवसांपासून होता बेपत्ता; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सानगडी येथील तलावात २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. आकाश तेजराम राऊत २८ वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी, २० ऑगस्ट रोजी दुपारी गावातील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशला दारूचे सेवन करण्याची सवय होती. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता त्याने वडिलांकडे पैसे मागितले. त्यानंतर तो घराबाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी दुपारी सानगडी गावातील तलावात आकाशचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावात पसरताच तलाव परिसरात नागरिकांची गर्दी झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही केली. याप्रकरणी किशोर रघुनाथ राऊत ५६, रा. सानगडी यांनी साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाशचा मृत्यू तलावात बुडून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच समोर येणार आहे. पोलिसांकडून या घटनेच्या सर्व शक्यता तपासल्या जात असून, शवविच्छेदन अहवालालाही महत्त्व राहणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अनीफ राऊत करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






Related Photos