महत्वाच्या बातम्या

 शिंगाड्याला कृषी पिकाचा दर्जा : शेतकऱ्यांना मिळणार सवलतींचा लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / गोंदिया : पूर्व विदर्भातील लहान बोड्या, तलावांत घेतले जाणारे पारंपरिक शिंगाडा पीक आता अधिकृतपणे फळ व भाजीपाला वर्गातील कृषी पीक म्हणून शासनाने मान्य केले आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे या पिकास इतर कृषी पिकांप्रमाणे शासकीय सवलती व योजनांचा लाभ मिळणार आहे.

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा -
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत शिंगाडा हे हंगामी उत्पन्नाचे महत्त्वाचे पीक आहे. मुख्यतः ढिवर, भोई, कहार समाजाचे लोक पारंपरिकरित्या तलावांमध्ये शिंगाडा पिकवत आले आहेत. हे पीक नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत घेतले जाते आणि स्थानिक बाजारात विकले जाते. एका कुटुंबास या व्यवसायातून दरवर्षी ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

शासन निर्णयामुळे वाढणार आर्थिक सुरक्षाही -
यापूर्वी शिंगाडा कृषी पिकाच्या यादीत नसल्यामुळे या पिकाचे नुकसान झाल्यास शासनाकडून कुठलीही भरपाई मिळत नव्हती, तसेच सेंद्रिय शेती, पीक विमा, अनुदानित बियाणे, कृषी पंप अशा योजनांपासून शेतकरी वंचित होते. पणन विभागाच्या अधिसूचनेनुसार आता शिंगाडा पिकाचा समावेश ‘शेती उपजांच्या अनुसूचीत’ कलम २(१-अ) अंतर्गत करण्यात आला आहे. लवकरच कृषी आयुक्त कार्यालयाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.

पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले पीक -
शिंगाडा (वॉटर चेस्टनट) केवळ उत्पन्नाचे साधन नसून आरोग्यदृष्ट्याही अत्यंत लाभदायक आहे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, प्रथिने, थायमिन यांसारखे पोषक घटक असतात. शिंगाड्याचे सेवन पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर करते, शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते आणि उपवासातही खाल्ले जाते. यामुळे बाजारात शिंगाड्याच्या मागणीला मोठी चलती असते.

स्थानिक पातळीवरून स्वागत -
सरिता मेश्राम, सदस्य, मत्स्य व तलाव महिला उत्पादक गट, सावरटोला म्हणाल्या,

शिंगाड्याला कृषी पिकाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई व अन्य शासकीय योजना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.स्थानिक स्तरावर अनेक सामाजिक गटांनीही या निर्णयाचे स्वागत करत, या व्यवसायाला अधिक चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

या व्यवसायालाही शेतीतील इतर पिकांप्रमाणेच मान्यता मिळाल्यामुळे, शासकीय सवलती व सुविधा यासाठी लागू कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

या निर्णयामुळे शिंगाडा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ आर्थिक आधार मिळणार नाही, तर पारंपरिक ज्ञान, कष्ट आणि व्यवसायालाही संविधानिक व शासकीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे या पिकाची लागवड अधिक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Gondia




Related Photos