महत्वाच्या बातम्या

 वरोरात बनावट देशी मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रहार १२.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त एक जण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने स्कॉर्पिओ वाहनातून अवैधरित्या बनावट देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत सुमारे १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास बोर्डा चौक, वरोरा, परिसरातील तेराधा मिलन मंगलकार्यालय रोडवर स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ सीडी ३३३६ मधून अवैधरित्या मद्यसाठा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ५० बॉक्समध्ये एकूण ५,००० नग बाटल्या आढळून आल्या. हा मद्यसाठा प्रथमदर्शनी बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्याची अंदाजे किंमत २ लाख रुपये असून महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आशीष रमेश मीटपल्लीवार (वय २३), रा. बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील तसेच अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दिडसे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, तसेच जवान विलास महाकुलकर (वाहन चालक) आणि जवान जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुयटे, अमोल भोयर, किशोर पेदजवार, शुभम गोवरदीपे यांनी केले.


सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos