तलावात पोहण्याच्या नादात गमावला जीव : बुटीबोरीच्या तरुणाचा मकरधोकडात मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / उमरेड (नागपूर) : तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
आदित्य उमाशंकर शर्मा वय १८, रा. सिर्सीनगर, बुटीबोरी असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवार १३ जुलै ला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या दुचाकीने चार मित्र मकरधोकडा तलावाच्या दिशेने आले. मृत आदित्य शर्मा याच्यासोबत बुटीबोरी येथील हिमांशू यादव, सुमित सोनटक्के आणि अनीश कौशद हे तिघे होते. काही वेळ चौघांनीही आनंद साजरा केला. तलावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या पाइपलाइनवर चौघेही बसले.
काही वेळातच आदित्य तलावात पोहण्यासाठी गेला. यातच तो खोल खड्डा असलेल्या पाण्यात गेला. मित्रांनी आदित्यला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तत्पूर्वी, क्षणभरातच आदित्य तलावाच्या पाण्यात दिसेनासा झाला. तलावाच्या काही अंतरावरच मोठ्या खड्ड्याचे खोदकाम केले गेले आहे. यामुळे हा परिसर धोकादायक आहे. आदित्यचा शोध घेण्यासाठी मकरधोकडा येथील नागरिकांनी बरेच प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी दिली.
मोह आवरा, जीव वाचवा :
पावसाळ्यात मकरधोकडा जलाशयाकडे हजारो पर्यटक हजेरी लावतात. धबधबा सुरू झाला की, या परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. दररोज दोन- चार हजार पर्यटक हजेरी लावतात. शेकडो वाहनांच्या रांगा परिसरात दिसून येतात. सध्या पावसाअभावी जलाशयात पाणीसाठा कमी आहे. असे असले तरीही या तलाव परिसरातील हिरवळ, धबधब्यासमोरील काळ्या दगडांचे सौंदर्य पर्यटकांना खुणावते. पर्यटकांनी या परिसरात आनंद साजरा करीत असताना पोहण्याचा मोह आवरावा, असे आवाहन पुरुषाेत्तम बोबडे यांनी केले आहे.
यापूर्वीही याच परिसरात अंघाेळ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा जीव गेला होता. पर्यटकांनी काळजीपूर्वक यावे. स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी. उद्दामपणा करू नये. सोबतच पोलिस बंदोबस्त सुरू करण्यात यावा.
News - Nagpur