महाडीबीटी पोर्टलवर तूर बियाणे अनुदानासाठी अर्ज करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला असून, आता तूर बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठीही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान २०२६-२०२७ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित तूर बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाडीबीटी पोर्टलवरील शेतकरी योजना या सदराखाली तूर बियाणे घटकासाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रमाणित तूर बियाणे वितरणासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असून, तसेच तूर मिनीकिटचे १०० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे कमी खर्चात उपलब्ध होऊन तूर उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात अथवा योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास संबंधित गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
तूर लागवडीचा हंगाम लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून शासनाच्या या अनुदानित बियाणे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




