महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : केवळराम हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मालेर(चक) येथे भेट देत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये विविध कृषी आणि गावस्तरावरील समस्यांबाबत जनजागृती केली. विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, समस्या निराकरणाचे उपाय तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित विविध समस्यांचा अभ्यास केला. यामध्ये पाण्याची टंचाई व अनियमित पाऊस, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बाजारपेठेपर्यंत उत्पादनाची वाहतूक आणि विक्रीतील अडचणी, हवामान बदलामुळे होणारे नुकसान, शेतीमजुरांची कमतरता तसेच पशुधन व्यवस्थापनातील समस्या आदी मुद्द्यांचा समावेश होता. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजनांची माहिती दिली.

हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच किशोर गहाणे, पल्लवी भांडेकर, छबिल दुधबळे, प्रलय झाडे, मृदाशास्त्र सहायक प्राध्यापक महेंद्र लिल्हारे आणि भोजराज कुमरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात समिरा दोडके, रिचा धकाते, भूमिका धाबेकर, सुजाता फुलबेल आणि अदिती दोनाडकर या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos