भारतात डिझेल वाहने होणार बंद : सरकारची ब्लूप्रिंट तयार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करू इच्छित असाल तर अत्यंत महत्वाची बातमी आहे. एवढेच नाही तर त्यासाठीची ब्लूप्रिंट देखील सरकारने तयार केली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे २०२७ पासून डिझेल गाड्यांची विक्री करता येणार नाही.
डिझेल वाहनांवर बंदीचा निर्णय -
भारतातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढीमुळे वायू प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. हे लक्षात घेता, ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने २०२७ पर्यंत सर्व डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे. डिझेल वाहने नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक पदार्थ उत्सर्जित करतात, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते. त्यामुळे माती आणि पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे बनवत आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधाही विकसित करत आहे.
कोणत्या शहरांत बंदी ?
ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे आणि लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्येच सरकारचा हा प्रस्ताव लागू केला जाणार आहे. यासोबतच १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनेही या बंदीच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. ही बंदी पेट्रोलवर चालणाऱ्या काही वाहनांनाही लागू होऊ शकते.
News - World